नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Friday, March 22, 2013

मुरणाऱ्या पाण्यात रुतलेला अर्थ

अर्थसंकल्पामुळे राज्याची स्थिती सुधारणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच असणार! त्याचा अन्वयार्थ लावणारा लेख...


Published in Loksatta : Thursday, March 21, 2013


महाराष्ट्रातील सिंचनात गेल्या काही वर्षांत किती वाढ झाली हा मोठाच वादाचा विषय ठरला आहे. हजारो कोटींचा निधी खर्च होऊनही राज्याच्या सिंचनात गेल्या दहा वर्षांत ०.१  टक्काच वाढ झाल्याचा दावा विरोधी पक्ष करीत आहे. राज्य सरकारला तो मान्य नाही. आपण राज्य शासनाच्याच प्रकाशनांच्या आधारे हा दावा करतो आहोत, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर शासनाने प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेने विरोधकांचे समाधान झालेले नाही. विरोधी पक्षांच्या रेटय़ाने शासनाने विशेष तपास पथकाची (एसआयटीची) स्थापना केलेली असली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही अशी भावना आता मूळ धरू लागली आहे. या सगळ्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीत सामान्य नागरिकांना मात्र खरे काय हे कळतच नाही. याविषयी थोडी सुस्पष्टता यावी हा या लेखाचा उद्देश.

Monday, March 18, 2013

'लेखा जोखा २०१३' प्रकाशित

मुंबई (विधान भवन) : लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते 'लेखा जोखा २०१३' अहवालाचे सोमवारी (दि.१८) विधान भवन येथे प्रकाशन झाले. गेल्या वर्षी 'स्पार्क'ला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पहिला लेखाजोखा प्रकाशित केला होता.

'लेखाजोखा २०१३' या अहवालात आठ विषयांचा लेखाजोखा घेण्यात आलेला आहे. राज्यासमोरील सर्वसमावेशक विकासाचे आव्हान, राज्यातील गंभीर सिंचनविषयक स्थिती, तोट्यात चाललेला सरकारचा दुग्ध व्यवसाय, राज्यातील महिला व बालकांना संरक्षण देण्यात शासनाचे अपयश, सार्वजनिक आरोग्याची हेळसांड, प्राथमिक शिक्षणाकडे होत असलेले दुर्लक्ष, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची निष्प्रभ अंमलबजावणी आदी संदर्भातील विश्लेषणाचा या अहवालात समावेश करण्यात आलेला आहे. अहवालाच्या प्रतसाठी ब्लॉगवर देण्यात आलेल्या ईमेल वर संपर्क साधावा.



ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर 'स्पार्क'च्या 'लेखा जोखा २०१३'चे प्रकाशन करताना. सोबत डावीकडून स्वानंद दाबके, आमदार देवेंद्र फडणवीस, 'स्पार्क'च्या संचालिका प्रिया खान, सुचेता हजारे, अंकुश बोबडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे आणि आमदार चंद्रकांत पाटील.

 'लेखाजोखा'चे मुखपृष्ठ

Friday, March 15, 2013

राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्या अभिभाषणावरील मुद्दे


मुद्दा क्रमांक 10: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना
माननीय राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा उल्लेख केलेला आहे. राज्य शासनाच्या अविरत प्रयत्नांमुळे केंद्र सरकार राज्यातील 123 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील प्रति कुटुंबास 100 ऐवजी 150 दिवसांपर्यंतच्या रोजगाराचा खर्च देणार असल्याचे राज्यपाल महोदयांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रापासून प्रेरणा घेऊन देशाने रोजगार हमी योजना स्वीकारली. 2007-08 पर्यंत कर्मचाऱयांच्या व्यवसाय कराची रक्कम व तेवढेच राज्य सरकारचे अनुदान राखीव रोजगार हमी निधीत जमा होत असे व त्यातून राज्याच्या रोजगार हमी योजनेवर खर्च केला जाई. 2007-08 मध्ये हा राखीव निधी एकत्रित निधीत वळविण्यात आला. राजकोषीय उत्तरदायित्त्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार शासनाने महसुली अधिक्य गाठल्याचे दाखविण्यात यावे यासाठी असे करण्यात आले. रोजगाराचा हा राखीव निधी एकत्रित निधीत वळविण्यास तेव्हा मोठा विरोध झाला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी मग शासनाने रु. 2,000 कोटींचा कॉर्पस योजनेसाठी राखून ठेवण्यात येईल अशी कायद्यात दुरुस्ती केली. जेणेकरून केंद्राच्या प्रति कुटुंब 100 दिवस रोजगाराच्या मर्यादेबाहेर जाऊन शासनास ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. मात्र शासनाने या तरतुदीची अंमलबजावणी केलीच नाही.

कायद्यात रु. 2,000 कोटींची तरतूद असतनाही राज्य शासन गरीब ग्रामीण मजुरास केंद्राकडून निधी मिळत नाही म्हणून मजुरी देण्यास तयार नाही. आताही केंद्राने 100 च्या ऐवजी 150 दिवसांची मागणी मान्य केली नसती तर राज्य शासनाने याबाबत स्वतःचा निधी दिला नसता.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही शासनाने 29 नोव्हेंबर 2012रोजी परिपत्रक काढून रु. 145 पेक्षा अधिक मजुरी दिल्यास संबंधित अधिकाऱयास त्याची कारणे देण्यास बजावले. साहजिकच अधिकाऱयांचा कल सरकारला कारणे देत बसण्यापेक्षा मजुराला अधिक मजुरी न देण्याकडे झुकला. राज्य शासन आश्वासनानुसार रोहयोसाठी निधी देत नसल्यामुळे व केंद्र शासन त्यांच्या निकषा पलिकडे (रु. 145 100 दिवस) अनुदान देत नसल्याने आता आम्ही कामांचे दरच असे ठरवू की जेणेकरून रु. 145 च्या वर मजुरी जाणरच नाही, अशी भूमिका रोहयो विभागाने घेतली आहे.

एवढे असंवेदनशील राज्यकर्ते असावेत यापेक्षा अधिक महाराष्ट्रातील जनतेचे दुर्भाग्य कोणते.

Friday, March 1, 2013

लोक आयुक्त कायद्याच्या तुलनात्मक अभ्यासासाठी महाराष्ट्राची समिती स्थापन

विधानसभेचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका अशासकीय विधेयकाद्वारे लोकायुक्तांचे अधिकार वाढवण्याची मागणी केली होती. तसेच लोकायुक्तांकडे स्वतंत्र पोलीस यंत्रणा असावी, तेथील खटले विशेष न्यायालयात चालवणे, अशीही मागणी त्यांनी केली होती. या मागण्यांचा सकारात्मक विचार करत मुख्यमंत्र्यानी कर्नाटक, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांच्या कायद्यातील तरतुदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट  स्थापन केला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे.


सरोगसी अधिनियम २०११ : तज्ज्ञ समितीची स्थापना

आमदार देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार १३ जुलै, २०१२ रोजी पावसाळी अधिवेशना दरम्यान विधान सभेत महाराष्ट्र साहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) अधिनियम २०११ (सरोगसी) या अशासकीय विधेयकावर चर्चा करून या विधेयकाची आवश्यकता पटवून दिली होती. आमदार फडणवीस यांच्या चर्चेनंतर मान. राज्यमंत्री फौजिया खान यांनी महाराष्ट्र साहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) अधिनियम, २०११ (सरोगसी) याची तांत्रिक मुद्द्यांद्वारे तपासणी करण्यासाठी तसेच साहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानातील विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने ५ फेब्रुवारी, २०१३ च्या शासन निर्णयाद्वारे या कायद्यातील तरतुदींचा अभ्यास  करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. समितीचा कालावधी समिती स्थापन झाल्यापासून ६ महिन्यांचा असेल. या कालावधीत समिती अहवाल सरकारला सादर करेल.